शिर्डी —
साईबाबांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीत, म्हणजेच शिर्डीत, नुकतेच राज्याचे मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या पुढाकाराने एक भव्य कीर्तन व प्रवचन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
कोरोना काळात लोकांच्या मनात निर्माण झालेल्या नैराश्याला अध्यात्मिकतेचा आधार मिळावा, भक्तांना पुन्हा जीवनाची नवी दिशा मिळावी, या उद्देशाने विखे कुटुंबीयांनी देशातील सुप्रसिद्ध कीर्तनकार परमपूज्य प्रदीप मिश्रा महाराज यांना विशेष मानधन देऊन या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे.
विखे कुटुंबियांचा हा उपक्रम शिर्डी व राहाता तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकास्पद ठरला आहे करोडो रुपयांचा खर्च करून होत असलेले हे भव्य आयोजन पाहून देशातील अनेक भाविकांनी आनंद व्यक्त केला. मात्र, हा अध्यात्मिक सोहळा सुरु होण्याआधीच एक अनपेक्षित वाद निर्माण झाला आणि त्यात मिश्रा महाराजच चर्चेच्या केंद्रस्थानी आले.
आज सदर प्रवचनासाठी शिर्डीत दाखल झाल्यानंतर मिश्रा महाराजांनी अगदी साईबाबांच्या समाधी मंदिराच्या जवळून जाताना साईबाबांच्या मंदिरात जाऊन साईदर्शन घेतले नाही, ही गोष्ट साईभक्तांच्या मनाला चांगलीच चटका लावणारी ठरली.
सोशल मीडियावर साईभक्तांनी याविरोधात नाराजी व्यक्त केली असून, “साईंच्या नगरीत येऊन साईबाबांचे दर्शन घेणे हे आधी कर्तव्य आहे, मग प्रदीप मिश्रा महाराजांनी ते का टाळले?” असा सवाल अनेक भक्त विचारत आहेत.
शिर्डी ही ती भूमी आहे जिथे आजवर ह्यादेशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, तसेच देशाचे शंकराचार्य देखील साईबाबांच्या चरणी नतमस्तक झालेले आहेत.
जगभरातील लाखो भक्तांना प्रेरणा देणाऱ्या या समाधीस्थळाचे दर्शन घेणे हे सन्मानाचे प्रतीक मानले जाते.
मग अशा पवित्र भूमीत येऊन साईबाबांना वगळण्याचे धाडस प्रदीप मिश्रा महाराजांनी कसे केले? —
“मग मिश्रा महाराज कोण आहेत?” असा सरळ प्रश्न आता साईभक्तांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
काही भक्तांनी असा आरोप केला आहे की, “मिश्रा महाराज हे मानधन घेऊन प्रवचन करतात, त्यामुळे त्यांची कृती व्यापारीक दृष्टिकोनातून दिसते, अध्यात्मिकतेतून नव्हे.”
तर काहींनी सांगितले की, “हे सर्व गैरसमज असून महाराजांना त्यामागे काही वैयक्तिक कारण असावे.”
परंतु प्रदिप मिश्रा महाराजांनी साईबाबांचे दर्शन का केले नाही, याचे कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण अद्याप त्यांनी दिलेले नाही.
या मौनामुळे साईभक्तांमध्ये संभ्रम आणि नाराजी अधिकच वाढली असून, ‘महाराजांनी कारण स्पष्ट का केले नाही?’ हा प्रश्न आता अधिक तीव्रतेने उपस्थित केला जात आहे.
साईभक्तांचे मत स्पष्ट आहे —
“साईंच्या नगरीत येऊन साईबाबांना वगळणे म्हणजे श्रद्धेचा अपमान.”
आता मिश्रा महाराजांकडून या संदर्भात खुलासा येतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.