
श्रीरामपूर | प्रतिनिधी
श्रीरामपूर शहरात अनेक गंभीर गुन्ह्यांमुळे चर्चेत असलेला आणि पोलिसांना अनेक महिन्यांपासून गुंगारा देत असलेला कुख्यात आरोपी जयप्रकाश उर्फ सोन्या अशोक बेग (वय ४१, रा. सरस्वती कॉलनी, वॉर्ड क्र. ७, श्रीरामपूर) याला अखेर श्रीरामपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. खून, खुनाचा प्रयत्न, मोक्का, पोक्सोसह तब्बल १६ गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या बेगच्या अटकेमुळे शहरातील गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. न्यायालयाने आरोपीला ६ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस त्याची सखोल चौकशी करीत आहेत.
भरदिवसा कार आडवी लावून रक्तरंजित हल्ला
२४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आवेज जुबेर शेख आणि त्यांचा मित्र राजीक पठाण हे मोटारसायकलवरून श्रीरामपूर शहरातील डावखर रोडने जात असताना जयप्रकाश उर्फ सोन्या बेग याने स्वतःची पांढऱ्या रंगाची कार त्यांच्या मोटारसायकलसमोर आडवी लावून त्यांना अडवले.
“इकडे काय करतो?” अशी विचारणा करत किरकोळ कारणावरून वाद घालत त्याने आवेज शेख यांच्यावर हल्ला चढवला. त्यानंतर त्याचे साथीदार दीपक आणि अन्य एका अनोळखी आरोपीने लोखंडी रॉड व लाकडी दांडक्यांनी आवेज शेख यांच्या हात, पाय, पाठ आणि डोक्यावर सपासप वार करत त्यांना गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर “पुन्हा या भागात दिसलास तर जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून गुन्हा
या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आवेज शेख यांच्यावर लोणी येथील पीएमटी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे ५ मार्च २०२६ रोजी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १६६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
अनेक महिने फरार… अखेर पोलिसांच्या जाळ्यात
गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्य आरोपी सोन्या बेग फरार झाला होता. श्रीरामपूर शहर पोलीस त्याचा सातत्याने शोध घेत होते. अखेर ३ जुलै २०२६ रोजी तो श्रीरामपूर शहरात आल्याची खात्रीशीर गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
१६ गंभीर गुन्ह्यांचा इतिहास
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, जयप्रकाश उर्फ सोन्या बेग याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, मोक्का, पोक्सो यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांसह तब्बल १६ गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. त्यामुळे त्याची अटक ही श्रीरामपूर पोलिसांसाठी मोठे यश मानली जात आहे.
पोलिसांचे विशेष पथक सक्रिय
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक दादाभाई मगर, रोशन निकम, अमोल पडोळे, शिवाजी बड़े, मच्छिंद्र कातखडे, सचिन दुकळे, रवींद्र शिंदे, अजित पाटील, अमोल गायकवाड, सागर पटारे आणि अमोल बनसोडे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
‘कायद्यापासून कोणीही मोठा नाही’
अनेक महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणारा आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये नाव असलेला आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात आल्याने श्रीरामपूर शहरात समाधान व्यक्त होत आहे. या कारवाईने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना स्पष्ट संदेश मिळाला आहे की, कितीही प्रभावशाली किंवा फरार असला तरी कायद्याच्या हातातून सुटका अशक्य आहे.
पोलिसांची धडाकेबाज कारवाई; श्रीरामपूर शहर पोलिसांचे सर्वत्र कौतुक!
अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या आणि तब्बल १६ गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या जयप्रकाश उर्फ सोन्या बेग याला अटक करून श्रीरामपूर शहर पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे अचूक सापळा रचत कोणताही अनुचित प्रकार न घडू देता कारवाई यशस्वी केली. या धाडसी आणि नियोजनबद्ध कारवाईबद्दल श्रीरामपूर शहर पोलिसांचे नागरिकांकडून कौतुक होत असून, गुन्हेगारांवर कठोर कारवाईची पोलिसांची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
अनेक न्यायालयीन प्रकरणांतील प्रलंबित वॉरंट; अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह?
उपलब्ध न्यायालयीन नोंदींनुसार, विविध न्यायालयांतील काही प्रकरणांमध्ये संबंधित आरोपींविरुद्ध एनबीडब्ल्यू (Non-Bailable Warrant), प्रोक्लेमेशन वॉरंट तसेच समन्स बजावणीबाबत नोंदी आहेत. काही प्रकरणांमध्ये न्यायालयासमोर सादर करण्यात आलेल्या अहवालांबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मात्र, संबंधित पोलिस अधिकारी किंवा विभागाची भूमिका अद्याप अधिकृतपणे समोर आलेली नाही. त्यामुळे या सर्व बाबींची सत्यता न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट होणे अपेक्षित आहे.

