
अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुचर्चित अवैध गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई करत रॅकेटमधील महत्त्वाचा आरोपी जालिंदर रामदास बोरुडे (रा. घोगरगाव, ता. श्रीगोंदा) याला अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपी गेल्या १० ते १२ दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार होता. अटक टाळण्यासाठी तो नगर तालुक्यातील हातवळण शिवारातील स्वतःच्या शेतातील झोपडीत लपून बसल्याचे तपासात उघड झाले.
लोणी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्यात सुरुवातीला नेवासा येथील डॉक्टर भणगे, दोन एजंट आणि सहा कुटुंबीय अशा नऊ जणांना अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, चारचाकी वाहने आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत अनेक एजंट, डॉक्टर आणि मेडिकल साहित्य पुरवठादारांना अटक केली.
श्रीरामपूर येथील डॉक्टर कुटे व डॉक्टर शेख यांच्यासह पुणे येथील दोन डॉक्टर आणि मेडिकल साहित्याचा पुरवठा करणाऱ्या आरोपींनाही अटक करण्यात आली. पुढील तपासात नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील डॉक्टर कुणाल वलटे आणि मेडिकल चालक सागर उन्हाळ यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यातील आरडगाव परिसरात आरोपी जालिंदर बोरुडे लपल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे आणि विशेष पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
आरोपीच्या क्रेटा कारमधून अवैधरित्या खरेदी केलेले आणि गर्भलिंग निदानासाठी वापरले जाणारे सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या बेकायदेशीर सोनोग्राफी मशीनची संख्या पाचवर पोहोचली असून चार चारचाकी वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत १९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये तब्बल सहा डॉक्टर, तीन मेडिकल चालक आणि एक मोठा मेडिकल साहित्य पुरवठादार यांचा समावेश आहे. राज्यभर पसरलेल्या या रॅकेटचे आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पोलीस कॉन्स्टेबल महादेव कोहक आणि संदीप राऊत यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. गुन्ह्याचा पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी भारती व सहाय्यक पोलीस निरीक्षक आठरे करीत आहेत.
🔴 आतापर्यंतची कारवाई एका नजरेत
▪️ १९ आरोपी अटक
▪️ ६ डॉक्टर गजाआड
▪️ ५ बेकायदेशीर सोनोग्राफी मशीन जप्त
▪️ ४ चारचाकी वाहने जप्त
▪️ अनेक एजंट आणि मेडिकल चालकांचा सहभाग उघड
▪️ राज्यव्यापी रॅकेटचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता
“मुलगी वाचवा”चा नारा देणाऱ्या समाजात गर्भलिंग निदानाच्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश करणाऱ्या या कारवाईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
नागरिकांचा सवाल कायम…!
सावळीविहीर, गोदावरी वसाहत, पिंपळस, केलवळ आणि एकुरखा येथील संशयितांवर कारवाई कधी?
लिंगनिदान व अवैध गर्भपात प्रकरणात आतापर्यंत १९ आरोपींना अटक झाली, ६ डॉक्टर गजाआड झाले, ५ सोनोग्राफी मशीन जप्त झाली. मात्र, तपासादरम्यान चर्चेत आलेल्या सावळीविहीर (ता. राहता), गोदावरी वसाहत, पिंपळस, केलवळ आणि एकुरखा परिसरातील काही संशयित व्यक्तींवर अद्याप कारवाई का झाली नाही, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
पोलिसांच्या तपासात अनेक धागेदोरे समोर येत असताना या भागातील संशयितांची भूमिका नेमकी काय आहे? त्यांची चौकशी झाली का? त्यांच्याविरोधात पुरावे मिळाले आहेत का? की तपास अद्याप सुरू आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे नागरिक मागत आहेत.
कायद्यापुढे सर्व समान असतील तर काहींवर धडाकेबाज कारवाई आणि काहींना अभय का, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तपास यंत्रणांनी या संदर्भात स्पष्ट भूमिका मांडून नागरिकांच्या शंकांचे निरसन करावे, अशी मागणी होत आहे.

