शिर्डीत महायुतीची जोरदार सुरुवात!
साईबाबा मंदिरासमोर शिवसैनिकांचा दमदार शक्ति-प्रदर्शनातून प्रचाराला प्रारंभ
शिर्डी │ महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांनी आज साईबाबांच्या पवित्र दर्शनाने आपल्या प्रचार मोहिमेला भक्कम सुरुवात केली. साईबाबा मंदिरासमोर विधिवत नारळ फोडून आणि जयघोषांनी वातावरण दणाणून टाकत शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते यांच्या नेतृत्वाखाली ही प्रचार यात्रा सुरु झाली.
सकाळपासूनच उत्साहाने जमलेल्या शिवसैनिकांनी भगवी पताका फडकावत आपल्या उमेदवारांना जंगी पाठिंबा दर्शवला. “जय शिवसेना!”, “महायुती विजयी होवो!” अशा घोषणा देत सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीचे प्रदर्शन केले. जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते यांनी उमेदवारांना विजयाच्या शुभेच्छा देत, “ही निवडणूक विकासाची आणि शिवसेनेच्या कामगिरीची आहे. मतदारांचा विश्वास आमची सर्वात मोठी ताकद आहे!” असे सांगत मोहिमेचा ध्वज उंचावला.
स्थानिक नागरिकांनीही या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. साईबाबांच्या मंदिरासमोर झालेल्या या विधीने उमेदवार आणि कार्यकर्त्यांना नवचैतन्य मिळाले असून, पुढील दिवसांत प्रचार अधिक जोमात सुरू राहील असा आत्मविश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला.
शिर्डीतल्या या धार्मिक आणि राजकीय वातावरणात महायुतीच्या प्रचाराची ही सुरुवात खरोखरच दमदार ठरली आहे.
