कोपरगाव (प्रतिनिधी) – कोपरगाव–शिर्डी नगर–मनमाड महामार्गावर आज दुपारी पुन्हा एकदा हाडं गोठवणारा अपघात घडला. खाजगी बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन कारने क्षणात पेट घेतला. कार ड्रायव्हर होरपळून जागीच मृत्यूमुखी पडला, तर कारमधील इतर प्रवाशांविषयी अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध नाही.
धडक इतकी भीषण होती की कार काही मिनिटांत जळून खाक झाली. घटनास्थळावर दिसणारे काळवंडलेले अवशेष, जळालेल्या धातूचे वाकडे तुकडे आणि कारची वितळलेली रचना पाहून उपस्थितांच्या अंगावर काटा आला.
तात्काळ मदतकार्य — पोलिस, अग्निशमन दल धावले
अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कुंभार यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव पोलीस तातडीने दाखल झाले.
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन दल आणि कोपरगाव नगरपालिकेचा अग्निबंबही घटनास्थळी पोहोचून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले.
पण कार पूर्णपणे पेट घेतल्याने ड्रायव्हरला बाहेर काढण्यास कोणालाच वेळ मिळाला नाही—नागरिकांनी डोळ्यांसमोर पाहिलेला हा क्षण अत्यंत हृदयद्रावक होता.
वाहतूक पूर्ण ठप्प – लांबच लांब रांगा
अपघात पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली.
महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
हा रस्ता म्हणजे सरळ मृत्यूचा सापळा!
नगर–मनमाड महामार्गावरील हा भूभाग अनेक वर्षांपासून “अपघाती ब्लॅक स्पॉट” म्हणून कुप्रसिद्ध आहे.
लोकांचा संताप उफाळून आला असून त्यांचे प्रश्न थेट प्रशासनाला भिडणारे आहेत:
**“पालकमंत्री साहेब, जिल्हाधिकारी साहेब…
PWD विभागाला अजून किती बळी लागले की डोळे उघडणार?”**
रस्त्याची दुर्दशा, खोल खड्डे, अंधार, गायब रोड मार्किंग, बेजबाबदार दुरुस्ती—सगळं मिळून हा रस्ता अक्षरशः मृत्यूला आमंत्रण देतो.
प्रशासनाची कागदावरील कामे – भूभाग मात्र तसाच धोकादायक
वर्षानुवर्षे रस्त्याची तात्पुरती डागडुजी होत असली तरी कायमस्वरूपी दुरुस्ती, रीकॉर्पेटिंग, साईनबोर्ड, कॅट आयज, स्पीड ब्रेकर, अपघात प्रतिबंधक उपाययोजना… यापैकी काहीच झालेले नाही.
हा रस्ता ‘मृत्यूचा कॉरिडॉर’ बनत चालला आहे!
आजचा अपघात ही फक्त चेतावणी नाही… हा प्रशासनाला मिळालेला शेवटचा इशारा आहे.
अपघातातील मृत्यूची संख्या वाढण्याची भीती
सध्या पोलिस तपास सुरू असून कारमध्ये आणखी किती प्रवासी होते, त्यांचं काय झालं — याबाबत अधिकृत माहिती येण्याची प्रतीक्षा आहे.
परंतु कार ड्रायव्हरचा जागीच होरपळून मृत्यू झाल्याची पुष्टी मिळाली आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशालाही केराची टोपली!
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे — स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्पष्ट निर्देशानंतरही या रस्त्याची दुरुस्ती अद्याप सुरु झालेली नाही. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजितदादांनी जिल्हाधिकाऱ्यांना आणि सर्व संबंधित विभागांना “हा रस्ता जीवघेणा झाला आहे; तात्काळ कामे सुरू करा” असा कडक आदेश दिला होता.
परंतु प्रशासनाने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD)
उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशालाच अक्षरशः केराची टोपली दाखवली आहे.
लोकप्रतिनिधींचे आदेश, मंत्र्यांचे निर्देश आणि लोकांच्या जिवाची काळजी — यापैकी कोणत्याच गोष्टीला किंमत नाही, असा थेट आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतरही काम सुरू न झाल्याने जनतेमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे.
यावर लोकांचा तीव्र सवाल—
**“उपमुख्यमंत्री बोलून गेले, तरी तुमचं मन मेलं नाही…
तर मग कोणत्या अधिकाऱ्याचे बोलणे ऐकणार?”**