राहाता (प्रतिनिधी) –
राहाता तालुक्यात दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर झालेल्या हल्ल्याने आणि लुटीने खळबळ उडाली आहे.
रामपुरवाडी येथील सचितानंद विजय गवळी (वय 33) या व्यापाऱ्यावर एकरुखे गावात तिघा इसमांनी हल्ला करून मोबाईल आणि चेक जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना दि. 31 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12.30 वाजता घडली.
गवळी हे “श्री माऊली एजन्सी” या नावाने शीतपेय आणि खाद्यपदार्थांचा व्यवसाय करतात. घटनेच्या दिवशी ते टाटा कंपनीची इंट्रा व्ही-30 मालवाहू गाडी (MH-17 CV 3063) घेऊन राहाता परिसरात माल वितरणासाठी गेले होते. एकरुखे गावात आठवडा बाजार असल्याने गर्दी होती. गाडी पुढे नेण्यासाठी त्यांनी हॉर्न दिला, मात्र याच कारणावरून तेथील सचिन सुरेश डोळस, प्रशांत सुरेश डोळस आणि अजय सुरेश डोळस (सर्व रा. एकरुखे) या तिघांनी रस्ता अडवून गवळी यांना गाडीतून खाली ओढले.
यानंतर त्यांनी हाताने, पायाने मारहाण करत “तु गावात माल विकायला कसा येतोस, आता तुला दाखवतो, गावात विक्री केलीस तर जिवंत ठेवणार नाही,” अशी धमकी देत शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता, गवळी यांच्या शर्टाच्या खिशातील ₹१५,००० किंमतीचा रेडमी नोट 13 प्रो+ मोबाईल (सिम नं. 7038024271, 8999846811) आणि त्याच मोबाईल कवरमध्ये ठेवलेला ₹७,००० रकमेचा प्रवरा बँकेचा चेक बळजबरीने ओढून नेला.
एकूण ₹२२,००० रुपयांचा माल चोरून नेण्यात आला असून, या प्रकरणी सचिन, प्रशांत आणि अजय डोळस या तिघांविरुद्ध गवळी यांनी राहाता पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सदर घटनेनंतर व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण असून, “राहाता तालुक्यात गुंडागिरी वाढत चालली आहे, बाजारपेठेत व्यापाऱ्यांवर खुलेआम हल्ले होत आहेत!” अशी चर्चा रंगली आहे.
स्थानिक नागरिक व व्यापारी वर्गाने पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी या प्रकरणात तत्काळ लक्ष घालून आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
— साईदर्शन न्यूज, राहाता 📰