राहुरी (प्रतिनिधी) — समाजातील प्रत्येक कुटुंब सुरक्षित, सशक्त आणि सजग व्हावे या हेतूने राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या “ऑपरेशन मुस्कान – भाग 2” मोहिमेला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. दिनांक 1 नोव्हेंबर 2025 पासून सुरू झालेल्या या जनजागृती उपक्रमाअंतर्गत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमाचा उद्देश — तालुक्यातील कोणत्याही मुलीचे अपहरण होऊ नये, यासाठी सामाजिक आणि मानसिक जागरूकता निर्माण करणे — असा असून, याच पार्श्वभूमीवर “खेळ सोशल मीडियाचा… प्रश्न कुटुंब व्यवस्थेचा” या विषयावर निबंध, वक्तृत्व आणि भित्तीपत्रक (चित्रकला) स्पर्धा घेण्यात आल्या.
17,329 विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग
आज दिनांक 6 नोव्हेंबर 2025 रोजी तालुक्यातील सुमारे 70 शाळांमधील तब्बल 17,329 विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला.
शाळास्तरावर (इ. 5 वी ते 7 वी), (इ. 8 वी ते 10 वी) तसेच महाविद्यालयीन स्तरावर (इ. 11 वी ते 12 वी व पदवीधर विद्यार्थी) या गटांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.
अनेक ठिकाणी शालेय समित्या, विद्यार्थ्यांचे पालक आणि गावातील पोलीस पाटील यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या उपक्रमाला प्रोत्साहन दिले.
पोलीस विभाग व शिक्षण विभाग यांचा संयुक्त उपक्रम
या उपक्रमाचे आयोजन राहुरी पोलीस स्टेशन आणि पंचायत समिती शिक्षण विभाग, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशासाठी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ, गणेश वाघमारे, राजेंद्र जाधव, नितीन सप्तर्षी, विष्णू आहेर, सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते, पोलीस हवालदार अशोक शिंदे, विजय नवले, संदीप ठाणगे, जयदीप बडे, आजिनाथ पाखरे, सचिन ताजणे, प्रमोद ढाकणे, नदीम शेख, सतीश कुराडे, अंकुश भोसले यांनी प्रभावीपणे सहभाग घेतला.
शिक्षण विभागाचे मोलाचे सहकार्य
या मोहिमेत तालुका गट शिक्षणाधिकारी श्री. मोहनीराज तुंबारे व त्यांचे सहकारी श्री. संतोष गुलदगड (विषय तज्ञ) तसेच तालुक्यातील सर्व 70 शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक व पोलीस पाटील यांनी हिरिरीने सहभाग घेत मोहिमेला यशस्वी केले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
“ऑपरेशन मुस्कान – भाग 2” या जनजागृती मोहिमेसाठी माननीय पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाकचौरे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. जयदत्त भवर यांनी सतत मार्गदर्शन केले.
मोहिमेचा उद्देश : ‘सुरक्षित कुटुंब, सजग समाज’
या मोहिमेचा मुख्य हेतू म्हणजे — प्रत्येक कुटुंबाने सोशल मीडियाच्या वापराबाबत जागरूक राहावे, मुलांमधील सुरक्षा भावना वाढवावी आणि समाजात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करावे.
राहुरी पोलीस स्टेशनने शिक्षण विभागासोबत उचललेले हे पाऊल बालसुरक्षेच्या दृष्टीने एक आदर्श पाऊल ठरत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.