कोपरगाव (प्रतिनिधी):
कोपरगाव येथील पुणतांबा फाटा मार्गे जाणाऱ्या जुन्या मुंबई–नागपूर हायवेवरील संवत्सर गावाजवळील गोदावरी नदीवरील पूल अत्यंत धोकादायक झाल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व स्थानिक प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला असून, भाविक, नागरिक आणि वाहनचालकांनी या बदलाची तात्काळ नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
🚧 वाहतूक बंद, पर्यायी मार्ग सुरु
पुलाच्या दोन्ही बाजूंना बंदिस्त अडथळे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे या मार्गाने जाणारी सर्व हलकी व जड वाहने आता पर्यायी मार्गाने वळवण्यात येत आहेत.
कोपरगावहून वैजापूरकडे जाणारी वाहने :
नगर–मनमाड हायवेवरील साईबाबा कॉर्नर येथून संजीवनी कारखाना मार्गे संवत्सर येथे येऊन पुढे हायवेवर जाऊ शकतील.
वैजापूरहून कोपरगावकडे येणारी वाहने :
संवत्सर गावातून संजीवनी कारखाना मार्गे साईबाबा कॉर्नर येथे येऊन पुणतांबा फाट्यावरून शिर्डी, संगमनेर, सिन्नर दिशेने प्रवास करता येईल.
⚠️ प्रशासनाचा इशारा व विनंती
स्थानिक प्रशासनाने पुलाची तपासणी करून तो वाहतुकीस अयोग्य आणि धोका निर्माण करणारा असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत या पुलावरून जाण्याचा प्रयत्न करू नये. तसेच वाहनचालकांनी प्रशासनाने दिलेल्या पर्यायी मार्गाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुलाच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीसंदर्भात संबंधित विभागाकडून तांत्रिक तपासणी सुरू आहे. आवश्यक निधी व मंजुरी मिळाल्यानंतर काम हाती घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
🚨 नागरिकांना आवाहन
कोपरगाव व परिसरातील नागरिक, प्रवासी, तसेच शिर्डी दर्शनासाठी येणारे साईभक्त यांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि पर्यायी मार्गाचा वापर करून प्रवास करावा. वाहतूक पोलिसांनी मार्गदर्शनासाठी विशेष पथक तैनात केले असून, ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत.
🕉️ सुरक्षित प्रवास करा — प्रशासनाचे नियम पाळा — अपघात टाळा!