
शिर्डी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सावळीविहीर बुद्रुक येथे आठ दिवसांपूर्वी झालेल्या चोरीच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. बालाजी ट्रेडर्स किराणाचे मालक अमित विजयकुमार दोशी यांच्या दुकानात मध्यरात्री सुमारे २० लाख रुपयांची चोरी झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात ऐवजांच्या किंमती कमी लावून फिर्यादीचे गांभीर्य कमी करण्यात आले असल्याची बाब अतिशय गंभीर असल्याचे भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी सांगितले. त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिका-यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून तातडीने सखोल तपासाची मागणी केली आहे.
ममता पिपाडा व डॉ. पिपाडा यांची पीडित कुटुंबाला भेट
या घटनेनंतर प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. ममता पिपाडा आणि भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी दोशी कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला. भेटीदरम्यान दोशी यांच्या पत्नी कोमल दोशी यांनी चोरीसंबंधी सविस्तर माहिती दिली.
११ तोळे सोनं, रोख रक्कम व चांदीचे ताट चोरीस गेले
चोरट्यांनी या घटनेत रोख चार लाख २२ हजार रुपये आणि सुमारे ११ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने — नेकलेस, अंगठ्या, बांगड्या, मंगळसूत्र, तसेच दोन चांदीची ताटे असा मुद्देमाल लंपास केला आहे. फिर्यादीत चोरीचा एकूण ऐवज सुमारे ७ लाख २२ हजार असा नमूद केला असला तरी बाजारभावानुसार सोन्याची किंमतच सुमारे १३ लाखांच्या आसपास आहे.
सीसीटीव्हीत चोरट्यांची स्पष्ट झलक — तात्काळ कारवाईची मागणी
सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे बिल्डिंगमध्ये तब्बल आठ मिनिटे थांबले होते हे स्पष्ट झाले आहे. त्यांनी आधीच रेकी केल्याचे संकेत मिळाले आहेत. ३२ ते ३४ वयोगटातील हे दोघे चोरटे दोरीच्या साहाय्याने वरच्या मजल्यावर पोहोचले. त्यांची कार्यपद्धती अत्यंत व्यावसायिक स्वरूपाची असल्याने तातडीने त्यांना गजाआड करून मुद्देमाल हस्तगत करण्याची मागणी डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केली आहे.

