
शिर्डी प्रतिनिधी
शिर्डी येथील बाबा डमाळे यांच्या मालकीच्या हॉटेल बाबा पॅलेस वर वयाची खात्री न करता अल्पवयीन मुलीस हॉटेल रुम दिल्याने पोक्सो गुन्ह्याअंतर्गत हॉटेल चालक व मालकास गुन्ह्यात आरोपी करून हॉटेल चालकास ४ दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे
दि.०४/०९/२०२५ रोजी शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर ८४८/२०२५ बी.एन.एस.६५ (१) सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,८,१२,१७ प्रमाणे दाखल झाला आहे.
सदर गुन्ह्याचे तपासात हॉटेल बाबाज पॅलेस, शिर्डी याचे मॅनेजर संतोष भाऊसाहेब गव्हाळे रा.श्रीरामनगर, शिर्डी यांनी अल्पवयीन मुलीस व तिच्या सोबतच्या मुलास हॉटेल मधील रुम ही कोणतेही कागदपत्र न घेता व मुलीचे वयाची खात्री न करता दिली व त्या रुममध्ये सदर अल्पवयीन मुलीवर तिच्या सोबतच्या मुलाने (आरोपीने) लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्यावरून सदर हॉटेल मॅनेजर संतोष भाऊसाहेब गव्हाळे रा. श्रीरामनगर, शिर्डी व हॉटेल मालक बाबा डमाळे रा. कोपरगांव यांना बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम २०१२ (पोक्सो कायदा कलम १७ अन्वये आरोपी करण्यात आले असून हॉटेल मॅनेजर यास तपासी अधिकारी पोलीस उप निरीक्षक निवांत जाधव यांनी अटक करून मा. न्यायालयासमोर हजर केले असता मा. सत्र न्यायालय, राहाता यांनी आरोपीस ४ दिवसांची पोलीस कोठडी मंजुर केली आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री. सोमनाथ घार्गे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर श्री. सोमनाथ वाकचौरे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग श्री. अमोल भारती, यांचे मार्गदर्शनाखाली रणजित गलांडे, पोलीस निरीक्षक शिर्डी पोलीस स्टेशन व त्यांचे पथक पोलीस उप निरीक्षक निवांत जाधव, पोहेकॉ संतोष लांडे, पोना गजानन गायकवाड पोकॉ विजय धनेधर, पोकों केवलसिंग राजपुत, मपोकों प्रियंका गुंड यांनी केलेली आहे.
तरी शिर्डी पोलीस स्टेशन वतीने सर्व हॉटेल/लॉजेस धारकांना आवाहन करण्यात येत आहे की, आपल्या मालकीचे / ताब्यातील हॉटेल / लॉजेस मध्ये अल्पवयीन मुलगी / मुलगा यांच्या वयाची खात्री न करता रुम देण्यात येऊ नये, तसे निदर्शनास आल्यास यापुढे हॉटेल/लॉजेस मालक व चालक यांना पोक्सो कायद्यान्वये सह आरोपी करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
असे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती व पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी आवाहन केले आहे