
सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण केल्याच्या कारणास्तव चिचोंडी पाटील , ता. जि . अहिल्यानगरचे सरपंच शरद खंडू पवार यांचे पद जिल्हाधिकारी डॉ . पंकज आशिया यांनी रद्द केल्याची माहिती माजी पंचायत समिती सदस्य तथा भारतीय जनसंसदचे जिल्हाअध्यक्ष सुधीर भद्रे यांनी दिली आहे .
सविस्तर माहिती देताना श्री . भद्रे यांनी सांगितले की शरद खंडू पवार यांनी काही वर्षांपूर्वी चिचोंडी पाटीलच्या एस .टी . स्टँड वरील सार्वजनिक रस्त्यावर गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडप टाकला . मंडपामधे शहीद महेंद्रकुमार सुदाम नालकुल आणि हाडांचे तज्ञ कै. पैलवान रामरावदादा पवार यांचे फोटो लावून शरद खंडू पवार यांनी चिचोंडी पाटीलच्या ग्रामस्थांची सहानुभूती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला .
गावातील लोकांना सदर मंडप गणेशोत्सवापुरताच राहील असे वाटले .मात्र शरद पवार यांनी मंडप न काढता आणि सार्वजनिक रहदारीचा रस्ता रिकामा न करून देता तेथे पत्र्याचे मोठे शेड उभे करून हरी ओम रियल इस्टेट नावाने ऑफिस थाटले .यासोबतच खरेदीखत नसलेल्या मस्जिद इनाम देवस्थानच्या जागेतच बांधलेल्या बंगल्याच्या समोर जाण्या येण्यासाठी कॉंक्रीटचा रस्ता तयार केला .बंगल्याच्या मागील बाजूस शासनाच्या निधीतून तयार केलेल्या रस्त्यावर जनावरांसाठी दावण बांधली .
या दावणीला बांधलेल्या जनावरांमुळे गावकऱ्यांना अडथळा निर्माण व्हायचा . शरद खंडू पवार यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत . त्यामध्ये गावातीलच एका व्यक्तीला चार चाकी गाडीने जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा 307 चा गुन्हा सुद्धा दाखल आहे .गावकरी कुणीही समोर येऊन बोलत नव्हते . त्यामुळे ही तीनही अतिक्रमणे काढण्यासाठी सरपंच शरद पवार यांना आपण तोंडी व लेखी सांगितले असता त्यांनी ही बाब मानली नाही .
उलट भद्रे कुटुंबीयांनी सार्वजनिक रस्ता अडवून अतिक्रमण केल्याचे बदनामीकारक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले आणि भद्रे यांचे नसलेले अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हा परिषद ,अहिल्यानगर समोर दि .20.01.2025 रोजी उपोषण केले .यावेळी गावातील ग्रामस्थांनी सुद्धा शरद खंडू पवार यांचे अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हा परिषद , अहिल्यानगरसमोर त्याचदिवशी आंदोलन केले .
चार दिवस चाललेल्या दोन्ही आंदोलनांचा निर्णय देते वेळी पंचायत समिती मार्फत चौकशी अधिकारी नेमण्यात आले .चौकशी अधिकारी यांनी भद्रे यांचे अतिक्रमण तुर्त सिद्ध होत नसल्याने आणि यासाठी महाराष्ट्र शासन संपादित गावठाण क्षेत्र 4.00 हे . ची मोजणी करून हद्द निश्चिती करण्याचा आदेश दिनांक 05.02.2025 रोजी दिला .
भद्रे यांचे अतिक्रमण नसल्याने व मोजणी केली तर सरपंच यांचाच बंगला अतिक्रमणात असल्याचे सिद्ध होणार असल्याने सरपंच , चिचोंडी पाटील यांनी आज पर्यंत मोजणी केलेली नाही .ग्रामस्थांनी सरपंच शरद पवार यांचे विरुद्ध केलेल्या तक्रार अर्जा प्रमाणे चौकशी अधिकारी यांनी पाहणी केली असता तीनही ठिकाणी अतिक्रमण असल्याचे सप्रमाण सिद्ध झाले .
अतिक्रमणाचा हा अहवाल आपण मा . जिल्हाधिकारी ,अहिल्यानगर यांच्याकडे सादर केला असता सरपंचपद जाण्याच्या भीतीने शरद पवार यांनी दावण काढून टाकली .त्याचप्रमाणे पद वाचविण्यासाठी एसटी स्टँड वरील अतिक्रमण केलेच नाही असा बनाव केला . यासाठी ग्रामपंचायतीच्या सदस्यांना व ग्रामविकास अधिकारी यांना सुद्धा वेठीस धरण्यात आले . सर्व काही ज्ञात असूनही त्यांनी अतिक्रमण नसल्याचा खोटा पंचनामाकरून खोटी कागदपत्र तयार केली .
पुन्हा जेव्हा चौकशी अधिकारी यांना जिल्हाधिकारी यांचे मार्फत अतिक्रमणे आहेत का हे पाहण्यासाठी पाठविले असता आधी दावण होती मात्र आता काढलेली आहे व इतर अतिक्रमणे तशीच असल्याचा अहवाल चौकशी अधिकारी यांनी जिल्हाधिकारी , अहिल्यानगर यांना सादर केला .
एवढा सगळा द्राविडी प्राणायाम करूनही आमचे वकील ॲड .सचिन चांगदेव इथापे आणि त्यांचे सहकारी ॲड . रणजीत पांडुरंग ताकटे यांनी सर्व बाजू न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या .मा .जिल्हाधिकारी श्री . पंकज आशिया यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकुन घेतल्यानंतर आणि पुरावे तपासून पाहिल्यानंतर शरद खंडू पवार हे सरपंच पदासाठी अपात्र असल्याचा लेखी निकाल दिल्याची माहिती श्री . सुधीर भद्रे यांनी दिली आहे .