
शिर्डी, – अपघातात मृत्यू व जखमी होणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन गणेशोत्सव काळात रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, श्रीरामपूर यांच्या वतीने ‘बाप्पाच्या गप्पा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा उद्देश गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षा विषयक जागृती निर्माण करणे हा आहे.
या उपक्रमाअंतर्गत रस्ता सुरक्षा संदेश देणारे सेल्फी-फलक (सेल्फी स्टॅण्ड) शहरातील गणेश मंडळांना दिले जाणार आहेत. नागरिक व भाविकांनी या फलकासमोर छायाचित्र काढून कार्यालयास तसेच इतर नागरिकांना पाठवावे. छायाचित्रांचा उपयोग सामाजिक माध्यमांवर करून जनजागृती केली जाणार आहे. तसेच, गणेश आरतीपूर्वी अधिकारी उपस्थित राहून नागरिकांना रस्ता सुरक्षा शपथ देतील व मार्गदर्शन करतील. सार्वजनिक गणेश मंडळांनी किंवा घरगुती स्तरावर रस्ता सुरक्षा विषयक देखावे सादर करता येतील.
शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा व गणेशोत्सव या विषयांवर चित्रकला स्पर्धा आयोजित केली जाईल. विद्यार्थ्यांनी घरून काढलेली चित्रे शाळेत जमा करावीत व शाळांनी ती एकत्रित करून कार्यालयास सादर करावीत. चित्रकलेचे विषय पुढीलप्रमाणे
–
१) गणेशोत्सव व दुचाकी वाहनचालकांचे हेल्मेट – सामूहिक सुरक्षा संदेश,
२) गणेशोत्सव व वाहन प्रदूषण – जनजागृतीपर संदेश,
३) गणेशोत्सव व रस्ता सुरक्षा – संयुक्त संदेश.
उपक्रमात सहभागी होणाऱ्यांनी छायाचित्रे, देखाव्याचे फोटो व व्हिडिओ तसेच स्पर्धकांचे नाव, पत्ता व संपर्क क्रमांक कार्यालयाच्या ई-मेल dyrto.17-mh@gov.in किंवा व्हॉट्सअॅप क्रमांकांवर – श्री. पांडुरंग सांगळे (९९६०६८४५६७) व श्री. गोकुळ सूळ (९०११८९९९३४५) यांना पाठवावेत. कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उत्कृष्ट देखावे व चित्रकला स्पर्धकांची पाहणी करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करतील.
नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन रस्ता सुरक्षा जनजागृतीस हातभार लावावा, असे आवाहन श्री.जोशी यांनी केले आहे.