
कोपरगाव तालुक्यातील चासनळी गावात आज दिनांक २२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान धक्कादायक घटना उघडकीस आली. दिलीप मिजगुळे यांनी कौटुंबिक वादातून पत्नी स्वाती मिजगुळे (अंगणवाडी सेविका) यांचा मारहाण करून खून केला आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सकाळपासून घराचा दरवाजा बंद असल्याने शेजाऱ्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता हा प्रकार समोर आला. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस तसेच शिर्डी उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, दिलीप गळफास घेतलेल्या अवस्थेत तर स्वाती मृतावस्थेत राहत्या घरात आढळून आल्या.
घरातील भिंतीवर दिलीप यांनी काही लिहून ठेवलेले आढळले असून, नेमके काय लिहिले आहे हे तपासानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
स्वाती मिजगुळे या अंगणवाडी सेविका असल्याने त्यांच्या मृत्यूने महिला वर्गासह संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे चासनळी गावात शोककळा पसरली आहे.