
शिर्डी,

साईसंस्थान व नाट्य रसिक मंचतर्फे २५ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत साई चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सुमारे सात हजार भाविक या पारायण सोहळ्यात सहभाग घेतील. त्यात दीड हजाराहून अधिक पुरुष भाविकांचा समावेश आहे. या पारायण सोहळ्याचे यंदाचे ३१ वे वर्ष आहे, अशी माहिती नाट्य रसिक मंचचे सचिव अशोक खंडू कोते यांनी दिली.
ते म्हणाले, नाट्य रसिक मंचातर्फे तीस वर्षांपूर्वी हा उपक्रम सुरू करण्यात आला. आता त्यात साईसंस्थान सहभाग घेत असल्याने या सोहळ्याला भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झाले. साईसंस्थानतर्फे पारायणार्थीसाठी मंडप, सुशोभित व्यासपीठ, ध्वनिक्षेपक योजना तसेच नाश्त्याची व्यवस्था केली जाते.
साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचे त्यासाठी मोलाचे सहकार्य लाभते. नगरपालिकेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांचाही हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सहभाग असतो. ग्रामस्थ देखील या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होतात. यंदा या उपक्रमांची पूर्वतयारी सुरू झाली आहे. येत्या २ ऑगस्ट रोजी काल्याचे कीर्तन आणि महाप्रसाद वाटपानंतर सोहळ्याची सांगता होईल.
नाट्य रसिक मंचचे अध्यक्ष अशोक नागरे, उपाध्यक्ष गणपत गोंदकर, ज्येष्ठ सदस्य अप्पासाहेब कोते, अशोकराव जगताप, अशोकराव गोंदकर, भाऊसाहेब साबळे, सुभाष घुगे, रमेश गोंदकर, प्रकाश गायके, चित्रा टोळे, रजनी जोगळेकर आदी आयोजनाकरिता विशेष परिश्रम घेत आहेत.