शिर्डी साईभक्तांच्या श्रद्धास्थानाच्या मान-सन्मानाचं रक्षण करणारी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. शिर्डीच्या साईबाबांविषयी समाजमाध्यमांतून बदनामीकारक विधान करणाऱ्या गौतम खट्टर आणि अजय गौतम या दोघांना राहाता न्यायालयनं दणका दिला आहे.
यापुढे साईबाबांबाबत कोणतेही वक्तव्य, मुलाखत, चर्चा किंवा भाष्य करण्यास सक्त मनाई करण्यात आली असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे.
सन 2023 मध्ये गौतम खट्टरनं सार्वजनिकरित्या आणि काही माध्यमांतून शिर्डीच्या साईबाबांविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधाने केली होती. त्यामुळे संपूर्ण देशभरातील साईभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी शिर्डी साईबाबा संस्थाननं कायदेशीर पाऊल उचलत राहाता येथील न्यायालयात दावा दाखल केला होता.
या प्रकरणात महत्त्वाचा निर्णय देताना न्यायालयानं खट्टर आणि अजय गौतम यांच्यावर साईबाबांबाबत कोणतेही विधान, मुलाखत आणि भाष्य करण्यावर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे शिर्डीकर आणि साईभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल माध्यमांवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. साईबाबा संस्थाननं हज यात्रेसाठी 35 कोटींचा निधी दिल्याची निखालस खोटी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवली जात आहे. असा कुठलाही निधी साईबाबा संस्थानने दिला नसल्याची माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे.
तसेच अशा प्रकारची खोटी माहिती सोशल माध्यमांवर पसरवणाऱ्यांविरोधातदेखील गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
भाविकांकडून येणाऱ्या देणगीचा वापर समाजासाठी होतोय- शिर्डी संस्थान भाविकांच्या सोयी-सुविधेसाठी निधी खर्च करते. संस्थानच्या वतीनं शिर्डीत साईनाथ आणि साईबाबा अशी दोन रुग्णालये चालवली जातात. यातील साईनाथ रुग्णालयात सर्वच रुग्णांना मोफत उपचार दिले जातात. त्याचबरोबर आशिया खंडातील सर्वात मोठे प्रसादालयदेखील संस्थानच्या वतीनं शिर्डीत चालवले जाते.
यात भाविकांना मोफत भोजन दिले जाते. तसेच साईबाबा संस्थानच्या वतीनं शिर्डीत शाळा आणि कॉलेज चालविले जात आहे. शिर्डी आणि पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी अल्प दरात शिक्षण दिले जाते. भाविकांकडून येणाऱ्या दानाचा लोकोपयोगी उपक्रम आणि शिर्डीतील विविध विकासकामांसाठी केला जातो, अशी माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
संस्थानची बदनामी करणाऱ्यांविरोधात होणार गुन्हा दाखल- साईबाबा संस्थानाला 50 लाख रुपयांहून अधिक विकासकामांसाठी खर्च करायचा असेल तर उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते.
त्यामुळे कुठलाही निधी साईबाबा संस्थाननं हजसाठी दिला नसल्याचे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी बोलताना सांगितलं आहे. साईबाबा आणि संस्थानाची बदनामी करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर अशा लोकांवर आता साईबाबा संस्थान थेट गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा गाडीलकर यांनी दिला आहे.