
शिर्डी (प्रतिनिधी) जागतिक महिला दिनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची पूर्ण कमान महिला कर्मचाऱ्यांनी सांभाळली. यामध्ये लोको पायलट, असिस्टंट लोको पायलट, ट्रेन मॅनेजर, टीसी आणि ट्रेन होस्टेस या सर्व महिला कर्मचारी आहेत.

पहिल्यांदाच, वंदे भारत एक्सप्रेस पूर्णपणे महिला क्रूद्वारे चालवली गेली. महिला दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून निघालेली विशेष वंदे भारत एक्सप्रेस क्रमांक 22223 साईनगर शिर्डी स्थानकावर पोहचल्यावर फटाक्यांची आतिषबाजी करत या महिलांचं स्वागत करण्यात आलं.
वंदे भारत एक्सप्रेस शिर्डी स्थानकावर पोहोचल्यानंतर लोकोपायलट सुरेखा यादव यांचा पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. यासह इतर महिलांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. महिलांसाठी विशेष इलेक्ट्रिक बग्गीची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी स्टेशन मास्तर कार्यालयासमोर केक कापून फटाक्यांची आतिषबाजी करून महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यानंतर या सर्व महिला कर्मचाऱ्यांनी साईबाबांच्या मंदिरात जाऊन साई समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं.महिला दिनानिमित्त ट्रेनचे लोको पायलट आणि असिस्टंट लोको पायलट, ट्रेन मॅनेजर, तिकीट तपासनीस तसंच ऑन-बोर्ड केटरिंग स्टाफ या सर्व महिला कर्मचारी होत्या. प्रवाशांनीही या ऐतिहासिक ट्रेनचं उत्स्फूर्त स्वागत केलं आणि महिलांच्या या भूमिकेचं अभिनंदन केलंआहे.
दरम्यान मध्य रेल्वेनं ‘एक्स’वर पोस्ट करत या क्षणाला ‘ऐतिहासिक क्षण’ म्हटलं आहे. महिला दिनाच्या निमित्तानं भारतीय रेल्वेमधील महिलांची ताकद, समर्पण आणि नेतृत्वाचा उत्सव साजरा करत आहे. “ऐतिहासिक क्षण! पहिल्यांदाच, वंदे भारत एक्सप्रेस पूर्णपणं महिला क्रूद्वारे चालवली जात आहे.
ट्रेन क्रमांक २२२२३ सीएसएमटी- साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून लोको पायलट आणि असिस्टंट लोको पायलट, ट्रेन मॅनेजर आणि तिकीट एक्झामिनर, ऑन-बोर्ड केटरिंग स्टाफ या सर्व महिला कर्मचाऱ्यांसह ट्रेन रवाना झाली. भारतीय रेल्वेमधील महिलांच्या ताकद, समर्पण आणि नेतृत्वाचा गौरव करणारा हा एक अभिमानास्पद क्षण आहे!” असं मध्य रेल्वेनं म्हटलं आहे. दरम्यान या सर्व रेल्वे अधिकारी कर्मचारी महिलांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.