
शिर्डी | प्रतिनिधी
श्री साईबाबांच्या पावन शिर्डीत प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेचे दर्शन घडवणारी घटना समोर आली आहे. श्री साईबाबा संस्थानच्या संरक्षण विभागात कार्यरत असलेले कर्मचारी घनश्याम शर्मा यांना गेट क्रमांक ३ जवळ रोख १० हजार रुपये असलेले पाकीट सापडले. या पैशांवर स्वतःचा हक्क न सांगता त्यांनी संपूर्ण रक्कम प्रामाणिकपणे संरक्षण कार्यालयात जमा केली.
साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो साईभक्त शिर्डीत येत असतात. अशा गर्दीच्या ठिकाणी एखाद्याचे पैसे हरवणे ही संबंधित व्यक्तीसाठी चिंतेची बाब ठरू शकते. मात्र, घनश्याम शर्मा यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे कर्तव्यनिष्ठा आणि नैतिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
सापडलेली रोख रक्कम त्यांनी तातडीने संरक्षण विभागाच्या कार्यालयात जमा करून प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला. त्यांच्या या कृतीचे मनापासून अभिनंदन होत असून, संस्थानच्या कर्मचाऱ्यांमधील कर्तव्यभावना आणि प्रामाणिकपणाचे हे उदाहरण कौतुकास्पद ठरत आहे.
घनश्याम शर्मा यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!