
शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिरात एका चित्रपट कलाकाराने पवित्र समाधीवर बसून चित्रीकरण केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर देश-विदेशातील साईभक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि वेळबद्ध चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा व सत्र न्यायालय, राहाता येथील अॅड. गोकुळ व्ही. ठुबे पाटील यांनी केली आहे.

फेसबुकवरील आपल्या सविस्तर भूमिकेत त्यांनी स्पष्ट केले की, सर्वसामान्य साईभक्तांना समाधीला स्पर्श करण्याची किंवा काही क्षण थांबण्याचीही परवानगी नसताना एका कलाकाराला समाधीवर बसून चित्रीकरण करण्याची परवानगी नेमकी कोणी आणि कोणत्या अधिकाराने दिली, हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. या परवानगीस तदर्थ समितीची मंजुरी होती का, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विधी व न्याय विभागाचा लेखी अभिप्राय घेतला होता का, अधिकृत आदेश कोणी दिला आणि यापूर्वी अशा प्रकारची परवानगी कधी देण्यात आली होती का, याची माहिती संस्थानने सार्वजनिक करावी, अशी मागणी त्यांनी केली.
त्याचबरोबर संस्थानातील भरती प्रक्रिया, निविदा, कर्मचारी प्रश्न, रुग्णालयातील औषध पुरवठा, मानव संसाधन विभाग, जनसंपर्क विभाग तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांवरील विविध तक्रारींचीही स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
संरक्षण विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह
चित्रीकरणासाठी आलेल्या पथकाकडे आवश्यक परवानग्या होत्या का, त्यांची ओळखपत्रे तपासण्यात आली होती का, समाधीवर जाण्याची लेखी परवानगी होती का, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप का केला नाही आणि त्या वेळचे सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्यात आले आहे का, याचीही स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी अॅड. ठुबे पाटील यांनी केली.
एडिट फोटो व्हायरल करणाऱ्यांवर फक्त मशीन जप्त करून उपयोग नाही
या प्रकरणात त्यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. सोशल मीडियावर श्री साईबाबांच्या पवित्र समाधीवर उभे असल्याचे किंवा समाधीचा अवमान होईल अशा प्रकारचे एडिट केलेले फोटो व व्हिडिओ तयार करून प्रसारित करणाऱ्यांवर फक्त मोबाईल किंवा संगणक जप्त करून काहीही उपयोग होणार नाही, तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
त्यांनी निदर्शनास आणून दिले की, यापूर्वीही श्री साईबाबा संस्थानने अशा एडिट फोटो तयार करून धार्मिक भावना दुखावणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे या प्रकरणातही कोणालाही अभय न देता समान निकषांवर कायदेशीर कारवाई करावी.
फोटो एडिट करून विकणाऱ्यांवर फक्त मशीन जप्त करून उपयोग नाही
या प्रकरणात अॅड. गोकुळ व्ही. ठुबे पाटील यांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. श्री साईबाबांच्या पवित्र समाधीवर उभे असल्याचे किंवा समाधीचा अवमान होईल अशा प्रकारचे एडिट केलेले फोटो तयार करून त्यांची विक्री करणाऱ्या व्यक्तींवर केवळ मोबाईल, संगणक किंवा इतर उपकरणे जप्त करून उपयोग होणार नाही. संबंधितांविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी त्यांची ठाम मागणी आहे.
त्यांनी नमूद केले की, यापूर्वीही श्री साईबाबा संस्थानने धार्मिक भावना दुखावणारे एडिट फोटो तयार करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली होती. त्यामुळे या प्रकरणातही बनावट फोटो तयार करून त्यांची विक्री करणाऱ्या व्यक्तींना कोणतेही अभय न देता समान निकषांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
