शिर्डी / मुंबई (प्रतिनिधी) —
मुंबईतील एका विवाहित तरुणीने पती आणि सासरच्या मंडळींवर सातत्याने शारीरिक, मानसिक अत्याचार आणि जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक तक्रार पोलिसांकडे दाखल केली आहे.
तक्रारदार अंशु अजय सिंह (वय 26, रा. भांडुप, मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केलं आहे की, तिचे पती अजय अभिनेष सिंह, शिक्षक (हिंदी हायस्कूल, घाटकोपर) यांनी लग्नानंतर काही दिवसातच तिच्यावर अत्याचार सुरू केले.
अंशु यांनी सांगितले की, अजयचे दुसऱ्या महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्यामुळे घरात सतत वाद व्हायचे. किरकोळ कारणावरून मारहाण, शिवीगाळ आणि जीव घेण्याचा प्रयत्न दोन वेळा करण्यात आला.
विशेषतः शिर्डीतील हॉटेल सिताराम पॅलेस येथे 16 जून 2024 रोजी अजय सिंह यांनी पत्नीचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला, परंतु हॉटेल कर्मचाऱ्यांनी वेळेत हस्तक्षेप करून तिला वाचवले. त्यानंतरही अत्याचार सुरूच राहिले.
अंशु यांच्या म्हणण्यानुसार, पती, सासू इंदु सिंह, सासरे अभिनेष बेचन सिंह आणि दिर विजय सिंह यांनी एकत्रितपणे मानसिक छळ, मारहाण आणि आर्थिक त्रास दिला.
पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला असून, या प्रकरणामुळे वैवाहिक अत्याचार आणि महिलांवरील हिंसेच्या घटनांबाबत पुन्हा चिंता व्यक्त केली जात आहे.

