
शिर्डी : शिर्डी शहरातील साई गणेश गॅस एजन्सीचे गॅस सिलेंडर वितरणाचा अक्षरशः बोजवारा उडाला असून नागरिक संतापाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. पहाटेपासून महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि कष्टकरी वर्ग गॅससाठी रांगेत उभा राहत असूनही अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांचे हाल होत असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.
⚠️ काळाबाजाराचा खेळ सुरु? नागरिकांची उघडपणे तक्रार
शहरात गॅसचा नियमित पुरवठा होत नसल्याने घरपोच सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. काही ठिकाणी मागच्या दाराने जादा दराने सिलेंडर विक्री होत असल्याचा गंभीर आरोप नागरिक करत आहेत. KYC व OTP प्रक्रिया पूर्ण करूनही गॅस मिळत नसल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत. घरगुती गॅसचा वापर हॉटेल व व्यावसायिक ठिकाणी होत असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.
🏢 पुरवठा अधिकाऱ्यांना थेट धडक; समीर वीर आक्रमक
या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष समीर वीर यांनी राहाता तालुका पुरवठा अधिकारी खरात यांची थेट भेट घेत तक्रार दाखल केली. नागरिकांची होत असलेली पिळवणूक तात्काळ थांबवावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि गॅस वितरण सुरळीत करावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
⏳ 24 तासांचा अल्टिमेटम; अन्यथा तहसीलसमोर आमरण उपोषण
“येत्या 24 तासांत परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार,” असा थेट इशारा समीर वीर यांनी प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे आता प्रशासन काय भूमिका घेते, याकडे शिर्डीकरांचे लक्ष लागले आहे

