
शिर्डी | प्रतिनिधी
साईनगरी शिर्डीत कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले. भररस्त्यात एका २५ वर्षीय तरुणाच्या पोटात धारदार चाकूने वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी अक्षय ऊर्फ आकाश सुरेश रणधीर (वय २५, रा. कालीकानगर, शिर्डी) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम 118(2), 118(1), 115(2), 352 व 35(2) अन्वये गंभीर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली असून हल्ल्यात वापरण्यात आलेला धारदार चाकू जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ८.५० वाजण्याच्या सुमारास सुभाष रोड परिसरात ही घटना घडली. आरोपी आणि जखमी यांच्यात पूर्वीपासून किरकोळ कारणावरून वाद होता. त्याच वादाचा राग मनात धरून आरोपीने जखमीला रस्त्यात गाठले. दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू असतानाच आरोपीने संतापाच्या भरात जवळील धारदार चाकू काढून जखमीच्या पोटावर जोरदार वार केला.
रक्ताच्या थारोळ्यात जखमी खाली कोसळताच परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमीला श्री साईबाबा रुग्णालयात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्याने मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ माहिती देण्यात आली. तांत्रिक तपास, साक्षीदारांची चौकशी आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी काही तासांतच आरोपीला अटक केली. त्याच्याकडून हल्ल्यात वापरण्यात आलेला चाकू जप्त करण्यात आला आहे.
शिर्डीत दिवसेंदिवस वाढत असलेल्या मारामाऱ्या, चाकूहल्ले आणि हिंसक गुन्ह्यांमुळे कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जागतिक कीर्तीच्या साईनगरीत अशा घटना वारंवार घडत असल्याने सराईत गुन्हेगारांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिर्डी पोलीस करीत आहेत.
जीवघेण्या हल्ल्याचे कारण काय?
दीड वर्षांपूर्वीच्या तक्रारीचा राग अन् थेट चाकूहल्ला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाऊ कलिम राजू सय्यद याने सुमारे दीड वर्षांपूर्वी आरोपीविरुद्ध मारहाणीची तक्रार दाखल केली होती. त्याच तक्रारीचा राग मनात धरून आरोपीने कलिम सय्यद याला शिवीगाळ व दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर हातातील कटर (छोटा चाकू) काढून त्याच्या पोटाच्या डाव्या बाजूला वार करून गंभीर जखमी केले.
दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या फिर्यादीवरही आरोपीने हल्ला चढविला. झटापटीदरम्यान आरोपीने त्याच कटरने फिर्यादीच्या कमरेच्या डाव्या बाजूला वार करून जखमी केले. त्यानंतर लाथाबुक्क्यांनीही मारहाण करण्यात आली.
या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार चव्हाण (बकल क्रमांक १५८२) पुढील तपास करीत आहेत.

