
गर्भलिंग रॅकेट प्रकरणात पोलिसांची जोरदार धरपकड सुरू!
लोणी : गर्भलिंग चाचणी व बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत जोरदार धरपकड मोहीम सुरू केली असून अनेक संशयित आरोपी सध्या पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात आतापर्यंत १३ आरोपींना अटक झाली असली तरी अजूनही काही महत्त्वाचे संशयित फरार असल्याने पोलिसांचे विशेष पथक विविध ठिकाणी छापेमारी करत आहे.
तपासादरम्यान राहता शहर, साकुरी येथील गोदावरी वसाहत तसेच सावळीविहीर परिसरापर्यंत या रॅकेटचे धागेदोरे पोहोचल्याची चर्चा असून काही कथित बोगस डॉक्टर, एजंट आणि मेडिकल नेटवर्कशी संबंधित व्यक्ती अचानक गायब झाल्याची माहिती समोर येत आहे. काही संशयितांचे मोबाईल बंद असून ते “नॉट रिचेबल” असल्याने पोलिस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.
विशेष म्हणजे काही आरोपींनी पोलिस कारवाईची चाहूल लागताच आपले क्लिनिक बंद केल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
त्यामुळे “मुख्य सूत्रधार अजूनही पडद्यामागे आहेत का?” असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, पोलिसांनी या संपूर्ण रॅकेटची आर्थिक साखळी, बेकायदेशीर गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा पुरवठा, एजंटचे जाळे आणि संशयित डॉक्टरांचे नेटवर्क यांचा सखोल तपास सुरू केला आहे. लवकरच आणखी काही मोठ्या कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
“गर्भलिंग चाचणीसारख्या अमानुष प्रकारात सहभागी असणाऱ्यांना कोणतीही सूट देऊ नये. फरार आरोपींना तातडीने अटक करून संपूर्ण रॅकेट उघड करावे,” अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

