
अहिल्यानगर, दि. १० – नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे अहिल्यानगर स्थानकावर रात्री ९.०० वाजता आगमन झाले. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते गाडीला हिरवा कंदील दाखवण्यात आला. या सेवेमुळे विद्यार्थी, व्यापारी व पर्यटकांना जलद व सुखद प्रवासाची सुविधा मिळणार असून, वेळ व खर्च वाचणार असल्याचे प्रा. शिंदे यांनी सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या निमित्ताने नागपूर येथील मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक आठवर आयोजित कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच आजच बेंगळुरू–बेलगावी व अमृतसर–श्री माता वैष्णो देवी कटरा वंदे भारत गाड्यांचाही शुभारंभ झाला.
नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेस देशातील सर्व वंदे भारत गाड्यांमध्ये सर्वाधिक अंतर पार करणारी गाडी असून, नागपूर ते पुणे हे अंतर जवळपास बारा तासांत पूर्ण होणार आहे. सध्या नगर–दौंड मार्गे जाणाऱ्या गाडीला १०० ते १२५ किलोमीटरचा अतिरिक्त फेरा पडतो. नगर ते पुणे असा थेट मार्ग तयार झाल्यास प्रवासाचे अंतर व वेळ कमी होईल,
यासाठी नियोजन होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर–अहिल्यानगर–पुणे हा महत्त्वाचा औद्योगिक पट्टा असून, येथील विकासासाठी नवीन रेल्वे मार्ग गरजेचा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेस प्रवासादरम्यान वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर व दौंड येथील स्थानकांवर थांबून दौंड कॉर्डलाइन मार्गे पुण्याला पोहोचणार आहे.
अहिल्यानगर येथील स्वागत समारंभप्रसंगी खासदार निलेश लंके, रेल्वेचे अतिरिक्त विभागीय प्रबंधक पद्मसिंह जाधव, वरिष्ठ विभागीय अभियंता विकास कुमार, माजी महापौर अभिषेक कळमकर, अभय आगरकर, योगीराज गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सभापती प्रा. शिंदे म्हणाले, परदेशातील रेल्वेच्या तुलनेत वंदे भारत सेवा सर्व बाबतीत उत्कृष्ट असून, नागपूर–पुणे हा सर्वाधिक अंतराचा मार्ग असल्याने विद्यार्थी, व्यापारी व पर्यटकांना मोठी सोय होणार आहे. पुण्यात जातांना रांजणगाव–सुपा परिसरातील वाहतूक कोंडीमुळे वेळ जातो, परंतु आता वेळ व पैसा दोन्ही वाचणार आहे.
तसेच छत्रपती संभाजीनगर–अहिल्यानगर–पुणे महामार्गासाठी नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे. पुण्याला जाताना दौंडमार्गे न जाता थेट पुण्याला जाता यावे, यासाठी नवीन रेल्वे मार्ग व्हावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी खासदार निलेश लंके यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. पद्मसिंह जाधव यांनी वंदे भारत रेल्वेच्या वैशिष्ट्यांविषयी माहिती दिली.
तसेच रेल्वे विभागाच्या वतीने आयोजित चित्रकला व निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.