
शिर्डी |
दिवाळीचा आनंद प्रत्येक सभासदाच्या घरापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, शिर्डी यांच्या वतीने दिवाळीनिमित्त शिधा, साखर, गोडेतेल व मिठाई वाटपाचा उपक्रम उत्साहात संपन्न झाला. शनिवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी साई उद्यान इमारत परिसर, पिंपळवाडी रोड, शिर्डी येथे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमामुळे साई संस्थानच्या कर्मचारी सभासदांच्या दिवाळीच्या आनंदात भर पडली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर होते. यावेळी शिर्डीच्या नगराध्यक्षा जयश्री थोरात, उपनगराध्यक्ष अमरसिंह शेळके, सोसायटीचे अध्यक्ष विठ्ठल तुकाराम पवार, उपाध्यक्ष पोपट काळे यांच्यासह सोसायटीचे संचालक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवाळी हा आनंद, आपुलकी, बंधुभाव आणि एकोप्याचा सण आहे. या सणानिमित्त संस्थेच्या सभासदांना जीवनावश्यक वस्तू व मिठाईचे वाटप करून त्यांच्या कुटुंबीयांच्या आनंदात सहभागी होण्याचा प्रयत्न सोसायटीच्या वतीने करण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, या भावनेतून या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले. डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थित कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
सोसायटीचे अध्यक्ष विठ्ठल तुकाराम पवार, उपाध्यक्ष पोपट भास्करराव काळे आणि संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. सभासदांच्या हिताला प्राधान्य देत सणासुदीच्या काळात त्यांच्या आनंदात सहभागी होण्याची परंपरा या उपक्रमातून जपण्यात आली.
शिर्डीसह परिसरातील विविध गावांत शिधा वाटप
शिधा वाटपाचा हा उपक्रम केवळ शिर्डीपुरता मर्यादित न ठेवता परिसरातील विविध गावांतील सभासदांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे. त्यानुसार दि. २५ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पिंपळस, खंडोबावाडी, कोल्हार, आडगाव, साकुरी, राहाता, नांदुर्खी, कोऱ्हाळे, डोऱ्हाळे, कनकुरी, निमगाव, रुई, शिंगवे, पिंपळवाडी, एकरुखे, अस्तगाव आदी गावांमध्ये तसेच निश्चित केलेल्या मंदिर व ग्रामपंचायत परिसरात नियोजित वेळापत्रकानुसार शिधा वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या उपक्रमाच्या माध्यमातून सभासदांना दिवाळीसाठी आवश्यक वस्तू उपलब्ध करून देतानाच त्यांच्या कुटुंबीयांच्या आनंदात सहभागी होण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. संबंधित सभासदांनी आपल्या गावातील निश्चित केलेले वाटपाचे ठिकाण व वेळ यांची खात्री करून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.
पदाधिकारी व मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, नगराध्यक्षा जयश्री थोरात, उपनगराध्यक्ष अमरसिंह शेळके, सोसायटीचे अध्यक्ष विठ्ठल पवार, उपाध्यक्ष पोपट काळे यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य महादू कांदतकर, कृष्णा आर. भाऊसाहेब कोकाटे, संभाजी तुरकणे, देविदास जगताप, विनोद कोते, मिलिंद दुनबळे, तुळशीराम पवार, रवींद्र गायकवाड, भाऊसाहेब लवांडे, इक्बाल तांबोळी, सौ. सुनंदा जगताप, सौ. लता बारसे, संभाजी गागरे, भाऊसाहेब लबंडे आदी उपस्थित होते. तसेच सोसायटीचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
सभासदांच्या आनंदात भर घालणारा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम साई संस्थान कर्मचारी क्रेडिट सोसायटीच्या कार्यातील महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला. दिवाळीच्या निमित्ताने शिधा व मिठाईचे वाटप करून कर्मचारी सभासदांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करण्यात सोसायटीने पुढाकार घेतला.