
शिर्डी : श्री साईबाबांच्या पवित्र समाधी मंदिरातील चोवीस तासांचे भक्तिमय वातावरण, भाविकांची अढळ श्रद्धा आणि श्री साईबाबा संस्थानच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध सेवाकार्याचा प्रभावी वेध घेणाऱ्या ‘२४ तास मंदिराच्या आत, शिर्डी’ या लघुपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत शिर्डीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
जयपूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि आर्यण राज फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आर्यण आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सव २०२६ मध्ये या लघुपटाला ‘गुणवत्ता प्रमाणपत्र’ प्रदान करण्यात आले आहे. विशेष म्हणजे लघु माहितीपट या विभागात या चित्रपटाने द्वितीय क्रमांकाचा मान पटकावत शिर्डीच्या साईभक्तीचा संदेश आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविला आहे.
हर्ष पांड्या आणि शेखर झा यांनी तयार केलेल्या या लघुपटातून श्री साईबाबांच्या मंदिरातील चोवीस तासांत घडणाऱ्या विविध धार्मिक, सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांचे वास्तवदर्शी चित्रण करण्यात आले आहे. मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून भाविकांसाठी दिवसरात्र सुरू असणाऱ्या विविध सुविधा, धार्मिक विधी, आरती, मंदिरातील परंपरा तसेच संस्थानच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध सेवाकार्याचा प्रभावी पट या लघुपटातून उलगडण्यात आला आहे.
शिर्डी हे केवळ एक तीर्थक्षेत्र नसून जगभरातील कोट्यवधी साईभक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. देश-विदेशातून श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येणारे भाविक, त्यांच्या मनातील श्रद्धा आणि मंदिर परिसरातील भक्तिमय वातावरण यांचे जिवंत दर्शन या लघुपटातून घडविण्यात आले आहे. त्यामुळे शिर्डीची साईभक्ती, येथील अध्यात्मिक परंपरा आणि सेवाभावाचा संदेश आता चित्रपटाच्या माध्यमातून देश-विदेशातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “श्री साईबाबांच्या पवित्र मंदिरातील आध्यात्मिक आणि भक्तिमय वातावरणाचे तसेच संस्थानच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध सेवाकार्याचे प्रभावी चित्रण करणाऱ्या या लघुपटाला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मिळालेला सन्मान ही श्री साईबाबा संस्थान आणि संपूर्ण शिर्डीसाठी अभिमानाची बाब आहे.”
ते पुढे म्हणाले, “शिर्डीतील साईभक्ती, मंदिराची परंपरा आणि येथील वैशिष्ट्यपूर्ण वातावरण चित्रपटाच्या माध्यमातून देश-विदेशातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे, ही निश्चितच अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.”
या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल श्री साईबाबा संस्थानच्या वतीने लघुपटाचे निर्माते, तंत्रज्ञ आणि संपूर्ण चमूचे अभिनंदन करण्यात आले आहे.
साईभक्तीचा संदेश, सेवाभावाची परंपरा आणि शिर्डीच्या अध्यात्मिक विश्वाचे प्रभावी दर्शन घडविणाऱ्या या लघुपटाला मिळालेल्या आंतरराष्ट्रीय सन्मानामुळे शिर्डीच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवात आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे.