
राहाता, दि. 31 : प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध मावा, गुटखा आणि सुगंधित तंबाखूच्या व्यवसायाविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी धडक कारवाई केली असून, या कारवाईत राहाता शहरातील शनिमंदिर रोडवरील मेहेत्रेनगर परिसरात छापा टाकून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सुमारे 31 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, राहाता शहरात अवैध गुटखा-मावा विक्रीचा व्यवसाय किती खुलेआम सुरू आहे, याबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध व्यवसायांची माहिती घेऊन कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली चार विशेष पथके तयार करण्यात आली होती.
या पथकांनी रविवारी, दि. 30 ऑगस्ट रोजी मिरजगाव, नेवासा, राहाता आणि राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरीत्या सुगंधित तंबाखू, मावा आणि गुटखा तयार करून विक्री करणाऱ्यांविरोधात एकाच दिवशी आठ ठिकाणी छापे टाकले.
राहाता शहरात तिघांच्या विरोधात कारवाई
राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 349/2026 अन्वये बीएनएस कलम 123, 223, 274, 275 तसेच 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात इम्रान शफी तांबोळी (वय 35), जमीर शफी तांबोळी (वय 38) आणि पापाभाई नजीर शेख (वय 53), सर्व रा. शनिमंदिर रोड, मेहेत्रेनगर, राहाता यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी या कारवाईत 31 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
विशेष म्हणजे, साईनगरी शिर्डीजवळील राहाता परिसरात अवैध मावा-गुटख्याची विक्री आणि पुरवठा सुरू असल्याच्या तक्रारी यापूर्वीही अनेकदा समोर आल्या आहेत. आता स्थानिक गुन्हे शाखेने थेट छापा टाकून कारवाई केल्याने अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात 13 आरोपी, 8 गुन्हे; साडेतीन लाखांचा मुद्देमाल
स्थानिक गुन्हे शाखेने मिरजगाव, नेवासा, राहाता आणि राहुरी येथे केलेल्या आठ कारवायांमध्ये 13 आरोपींविरुद्ध आठ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण 3 लाख 18 हजार 284 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत काही आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
राहाता परिसरातील अवैध धंद्यांवर आता मोठा प्रश्न!
राहाता शहरातच थेट मावा आणि गुटखा जप्त झाल्याने अवैध तंबाखू व्यवसायाचे जाळे नेमके किती मोठे आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. केवळ कारवाई करून थांबण्याऐवजी या अवैध व्यवसायामागील पुरवठादार, मोठे व्यापारी आणि मुख्य सूत्रधार कोण आहेत, याचाही शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार आणि पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
राहाता शहरातील या कारवाईनंतर आता एकच प्रश्न चर्चेत आहे—छोट्या विक्रेत्यांवर कारवाई झाली; मात्र अवैध मावा-गुटख्याच्या पुरवठ्याची ‘मुळं’ शोधून मोठ्या मास्यांपर्यंत पोलीस पोहोचणार का?
