शिर्डी | प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यात प्रतिबंधित गुटख्याच्या तस्करीविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू असतानाच राहता आणि शिर्डी परिसरात गुटखा विक्री पुन्हा जोमाने सुरू असल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीच्या कारवाईत गुन्हे दाखल झालेल्यांपैकी काही आरोपी फरार असतानाही त्यांच्या संपर्कातील व्यक्तींकडून गुटख्याची विक्री सुरू असल्याची चर्चा असल्याने ‘या बेकायदेशीर धंद्याला नेमका कोणाचा आशीर्वाद?’ असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
पाच लाखांचा गुटखा जप्त; १२ जणांवर गुन्हे
मागील आठवड्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शिर्डी परिसरात कारवाई करत प्रतिबंधित गुटखा विक्री करणाऱ्यांना रंगेहात पकडले होते. या कारवाईत सुमारे पाच लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.
या प्रकरणात सुमारे १२ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र उर्वरित आरोपी फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.
यामध्ये राहता येथील बंटी लहामगे याचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
एकीकडे आरोपी फरार; दुसरीकडे गुटखा विक्री सुरूच?
कारवाईनंतर गुटखा तस्करीचे जाळे खिळखिळे होणे अपेक्षित असताना राहता-शिर्डी परिसरात पुन्हा गुटखा विक्री सुरू असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
फरार आरोपींच्या संपर्कातील व्यक्तींकडूनच हा व्यवसाय सुरू असल्याचा आरोप होत असेल, तर पोलिसांनी या संपूर्ण नेटवर्कच्या मुळापर्यंत जाण्याची गरज आहे.
कारवाईत किरकोळ विक्रेते पकडून गुटखा तस्करी थांबणार आहे का? की या काळ्या धंद्याच्या मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचणार?
हा प्रश्न आता पोलिसांसमोर आहे.
‘कोणाचा आशीर्वाद?’ हा सवाल अनुत्तरित का?
राहता आणि शिर्डीसारख्या महत्त्वाच्या परिसरात प्रतिबंधित गुटख्याची खुलेआम विक्री होत असल्याच्या तक्रारी येत असतील, तर हा प्रकार केवळ काही दुकानदारांचा नसून त्यामागे मोठे नेटवर्क असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गुटखा कुठून येतो? कोण पुरवतो? कोणाच्या माध्यमातून विकला जातो? पैसे कोण गोळा करतो? आणि पोलिसांच्या कारवाईनंतरही पुन्हा माल बाजारात कसा पोहोचतो?
या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे.
नूतन निरीक्षक सरोदे यांच्याकडून अपेक्षा
राहता पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक सरोदे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन राहता-शिर्डी परिसरातील गुटखा विक्रीविरोधात तातडीने विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
केवळ विक्रेत्यांवर कारवाई न करता पुरवठादार, साठवणूक करणारे आणि संपूर्ण तस्करीचे नेटवर्क शोधून काढण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
दैनिक साईदर्शनचा थेट सवाल
पोलिसांनी लाखोंचा गुटखा पकडला, आरोपींवर गुन्हे दाखल केले; तरीही बाजारात गुटखा पुन्हा उपलब्ध होत असेल तर पोलिसांच्या कारवाईत नेमकी कोणती कडी सुटतेय?
फरार आरोपींच्या नावावर गुन्हे दाखल होतात; पण त्यांचे नेटवर्क सुरूच असेल तर त्यावर अंकुश कोण लावणार?
राहता-शिर्डीतील गुटखा तस्करीच्या या कथित जाळ्याचा ‘बिग बॉस’ कोण, हे पोलिसांनी उघड करावे, अशीच नागरिकांची अपेक्षा आहे.
गुन्हा दाखल असताना आरोपी राजरोस फिरतोय; राहता पोलीस ताब्यात घेणार का?
गुटखा तस्करीप्रकरणी गुन्हा दाखल असून फरार असल्याचे सांगितले जात असतानाही संबंधित आरोपी राजरोसपणे परिसरात फिरत असल्याची चर्चा आहे. जर संबंधित व्यक्तीविरुद्ध दाखल गुन्ह्यात अटक बाकी असेल, तर राहता पोलिसांकडून त्याचा शोध घेऊन कायद्यानुसार ताब्यात घेण्याची कारवाई होणार का?
फरार आरोपी पोलिसांच्या नजरेसमोर फिरत असेल, तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांना आणखी कोणत्या पुराव्याची प्रतीक्षा आहे?
गुटखा तस्करीचे नेटवर्क मोडीत काढण्याचा दावा होत असताना फरार आरोपी मोकाट फिरत असल्याची परिस्थिती निर्माण झाली असेल, तर या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.
दैनिक साईदर्शनचा सवाल — गुन्हा दाखल असलेला आरोपी खरंच फरार आहे की पोलिसांच्या कारवाईपासून दूर आहे? राहता पोलीस आता नेमकी कोणती भूमिका घेणार?