
शिर्डी | प्रतिनिधी :
साईबाबांच्या पावन नगरीत देशभरातून येणाऱ्या साईभक्तांच्या सुरक्षिततेचा आणि सन्मानाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मेघा धर्मशाळा, मंत्रा हॉटेलच्या मागील परिसरात रिक्षाचालकाच्या मुजोरीचा व्हिडिओ समोर आला असून, हा व्हिडिओ संबंधित साईभक्त व सामाजिक कार्यकर्ते कस्बे यांनी अनेक ग्रुपवर प्रसारित करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या व्हिडिओमध्ये संबंधित प्रकाराचे दृश्य असल्याचे सांगण्यात येत असून, त्याची सत्यता तपासून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
या प्रकरणात MH17AJ2830 क्रमांकाच्या रिक्षाचालकावर चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी साईभक्त व सामाजिक कार्यकर्ते कस्बे यांनी केली आहे.
₹३०० भाडे नाकारले; दुसरी रिक्षा ठरवल्यावर ₹५० देण्याचा दबाव?
मिळालेल्या माहितीनुसार, साईभक्तांना साईनगर रेल्वे स्थानकाकडे जायचे होते. संबंधित रिक्षाचालकाने त्यांच्याकडे ₹३०० भाड्याची मागणी केल्याचा आरोप आहे. साईभक्तांनी ते भाडे नाकारून ₹२०० मध्ये दुसरी रिक्षा ठरवली.
यानंतर संबंधित रिक्षाचालकाने दुसऱ्या रिक्षेला अडवत ₹५० देण्याची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. “आमची युनियन आहे, पैसे दिलेच पाहिजेत,” अशा स्वरूपाची दादागिरी करण्यात आल्याचाही दावा आहे.
या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत असून, त्यामुळे केवळ आरोप-प्रत्यारोप न करता व्हिडिओची निष्पक्ष पडताळणी करून सत्य परिस्थिती समोर आणण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे.
व्हिडिओ अनेक ग्रुपवर फिरला; तरी कारवाई कुठे?
सामाजिक कार्यकर्ते कस्बे यांनी संबंधित व्हिडिओ अनेक ग्रुपमध्ये प्रसारित करून रिक्षाचालकाच्या वर्तनाबाबत कारवाईची मागणी केल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्यानंतरही वाहतूक विभाग अथवा संबंधित यंत्रणेकडून ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप आहे.
यामुळे आता सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे—साईभक्तांच्या सुरक्षेसाठी व्हिडिओ पुरावा समोर आल्यानंतरही प्रशासन कारवाई करणार नसेल तर आणखी कोणता पुरावा हवा?
वाहतूक शाखेचे ‘अतिकर्तव्यदक्ष’ अधिकारी येसेकर कारवाई करणार की आदेशाची वाट पाहणार?
साईभक्तांची पिळवणूक होत असल्याची तक्रार, संबंधित रिक्षाचा क्रमांक आणि घटनेचा व्हिडिओ उपलब्ध असल्याचे सांगितले जात असताना वाहतूक शाखेचे अधिकारी येसेकर याप्रकरणी काय भूमिका घेतात, याकडे आता शिर्डीकरांचे लक्ष लागले आहे.
“जोपर्यंत नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा आदेश येत नाही, तोपर्यंत वाहतूक शाखा कारवाई करणार नाही का?” असा थेट सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
हा सवाल केवळ एका रिक्षाचालकापुरता मर्यादित नसून, शिर्डीत कायदा सर्वांसाठी समान आहे की कारवाईसाठी राजकीय आदेशाची गरज आहे? या मोठ्या प्रश्नाशी जोडला गेला आहे.
‘साईभक्तांची पिळवणूक थांबवण्यासाठी आदेशाची गरज का?’
शिर्डीत दररोज हजारो साईभक्त येतात. त्यांना सुरक्षित, सन्मानजनक आणि पारदर्शक वाहतूक सुविधा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. एखाद्या रिक्षाचालकाकडून मनमानी भाडे, अडवणूक किंवा दादागिरी झाल्याची तक्रार आणि त्यासंदर्भातील व्हिडिओ उपलब्ध असल्यास नियमाप्रमाणे चौकशी करून कारवाई करण्यासाठी कोणत्याही राजकीय आदेशाची आवश्यकता असू नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
मेघा धर्मशाळा परिसरातील रिक्षा स्टँडचीही चौकशी करा
मेघा धर्मशाळा परिसरात रिक्षा उभ्या करून साईभक्तांकडून मनमानी भाडे आकारले जाते का? रिक्षा स्टँड अधिकृत आहे का? चालकांकडे वैध परवाने व कागदपत्रे आहेत का? मद्यपान करून वाहन चालविले जाते का? याचीही वाहतूक विभाग आणि RTO श्रीरामपूर यांनी तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.
साईभक्तांच्या लुटीवर आता ‘ब्रेक’ लागणार का?
साईबाबांच्या नगरीत येणाऱ्या भक्ताला दर्शनासाठी येताना रिक्षाचालकांच्या दादागिरीला सामोरे जावे लागत असेल तर ही शिर्डीच्या प्रतिमेसाठी गंभीर बाब आहे.
त्यामुळे संबंधित व्हिडिओची अधिकृत तपासणी करून, त्यातील व्यक्ती व वाहनाची ओळख पटवून, वाहतूक नियमांचे उल्लंघन, परवाना अटींचे उल्लंघन किंवा इतर कोणताही कायदेशीर गुन्हा आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
आता प्रश्न एवढाच—
व्हिडिओ आहे, रिक्षाचा क्रमांक आहे, ; मग कारवाई का नाही?
कारवाईसाठी नामदार विखे यांच्या आदेशाचीच वाट पाहावी लागणार आहे का?
की शिर्डीतील वाहतूक शाखा स्वतःच्या अधिकारात कायद्यानुसार कारवाई करून साईभक्तांना न्याय देणार?
याचे उत्तर आता वाहतूक शाखेचे अधिकारी येसेकर आणि संबंधित प्रशासनानेच द्यावे, अशी मागणी साईभक्त व नागरिकांकडून होत आहे.
कायदा सर्वांसाठी समान की आदेशाची गरज?
पोलीस विभागात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तसेच लागू असलेल्या कायदेशीर तरतुदींनुसार तक्रारीची दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करणे ही संबंधित यंत्रणेची जबाबदारी आहे. मग वाहतूक शाखेचे अधिकारी येसेकर संबंधित रिक्षाचालकाविरुद्ध कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई का करत नाहीत? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
ज्या रिक्षाचालकाने साईभक्तांशी दादागिरी केल्याचा आरोप आहे, त्या घटनेचा व्हिडिओ उपलब्ध असल्याचे सांगितले जात असताना त्याची चौकशी करून सत्यता तपासण्यास आणि दोष आढळल्यास कारवाई करण्यास विलंब का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
“कारवाई करण्यासाठी कोणाच्या विशेष आदेशाची गरज नसताना कारवाई झाली नाही, तर नेमके कारण काय? कायदा सर्वांसाठी समान असेल तर साईभक्तांच्या तक्रारीतही तोच निकष लागू व्हायला हवा,” अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
आता व्हिडिओची सत्यता तपासून संबंधित रिक्षाचालकावर कायद्यानुसार कारवाई होणार का, याकडे शिर्डीकरांचे लक्ष लागले आहे.
व्हिडिओ पुरावा असताना येसेकरांची कारवाईला टाळाटाळ का?
कायद्याने कारवाईला आदेशाची गरज नसताना ‘नामदारांच्या आदेशाची’ प्रतीक्षा का?