
शिर्डी, दि. १७ ऑगस्ट २०२६ :
श्री साईबाबांच्या चरणी श्रद्धा, सबुरी, सेवा आणि समर्पण या भावनेने प्रेरित होऊन उदयपूर ते शिर्डी पदयात्रा करणारे साईभक्त श्री. मोहित आचार्य यांच्या सातव्या पदयात्रेचा दि. १६ ऑगस्ट रोजी शिर्डीत आगमनाने भक्तिमय वातावरणात समारोप झाला.
उदयपूर ते शिर्डी असा शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण करून शिर्डीत दाखल झाल्यानंतर मोहित आचार्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. त्यांच्या या अखंड भक्तीप्रवासाचे उपस्थित साईभक्तांनी कौतुक केले.
यावेळी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांनी मोहित आचार्य यांचा सत्कार करून त्यांच्या भक्तीभावाचे, सेवावृत्तीचे आणि दृढ संकल्पाचे कौतुक केले. साईबाबांवरील अढळ श्रद्धेतून सातत्याने पदयात्रा पूर्ण करण्याची त्यांची जिद्द निश्चितच प्रेरणादायी असल्याचे यावेळी गौरवोद्गार काढण्यात आले.
२०१५ मध्ये घेतला ११ पदयात्रांचा संकल्प
मोहित आचार्य यांनी सन २०१५ मध्ये श्री साईबाबांच्या चरणी उदयपूर ते शिर्डी अशा ११ पदयात्रा करण्याचा संकल्प केला होता. या संकल्पाची पूर्तता करण्याच्या दिशेने ते दरवर्षी निष्ठेने पदयात्रा करीत आहेत.
दरवर्षी उदयपूर येथील पॅसिफिक मेडिकल कॉलेज परिसरातील श्री साईबाबा मंदिरापासून त्यांच्या पदयात्रेला प्रारंभ होतो. यंदाची सातवी पदयात्रा २९ जुलै रोजी सुरू झाली आणि १६ ऑगस्ट रोजी शिर्डीत पोहोचून पूर्ण झाली.
‘श्रद्धा आणि सबुरी’चा संदेश देणारा भक्तीप्रवास
पायी प्रवासातील अनेक अडचणी, ऊन-पाऊस आणि शारीरिक थकवा यांचा सामना करत साईनामाचा जप करीत मोहित आचार्य यांनी ही पदयात्रा पूर्ण केली. त्यांच्या या भक्तीप्रवासातून ‘श्रद्धा आणि सबुरी’ या साईबाबांच्या शिकवणीचा प्रत्यय येतो.
साईबाबांच्या चरणी घेतलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी सातत्याने सुरू असलेली त्यांची ही पदयात्रा केवळ एक प्रवास नसून भक्ती, निष्ठा आणि समर्पणाची प्रेरणादायी वाटचाल ठरत आहे. त्यांच्या उर्वरित चार पदयात्राही याच श्रद्धेने पूर्ण होऊन ११ पदयात्रांचा संकल्प साईचरणी पूर्णत्वास जावो, अशी भावना साईभक्तांनी व्यक्त केली.